चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील घाट रोडवरील ट्रॅक्टर विक्रेत्याला ट्रॅक्टर विकत घेत असल्याचे सांगून दोन दिवसांसाठी ट्रायल म्हणून घेवून जात असल्याचे सांगून ट्रॅक्टर साखर कारखान्यात भाड्याने देवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, गोकुळ आत्माराम पाटील वय ४९ रा. खंडेराव नगर, जळगाव यांचे चाळीसगाव शहरातील घाट रोडवर गोकूळ ट्रॅक्टर विक्रीचे शोरूम आहे. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वाडीलाल सिताराम राठोड रा. सांगवी ता.चाळीसगाव, विठ्ठल रघुनाथ जाधव रा. शिवापूर ता. चाळीसगाव आणि अर्जून इंदल जाधाव रा. राजदोहरे ता. चाळीसगाव हे शोरूमवर आले. ट्रॅक्टर विकत घेण्यात आहे, असे सांगून ट्रॅक्टर विक्रेता गोकूळ पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दोन दिवसांसाठी ट्रायल म्हणून तिघेजण ट्रॅक्टर घेवून गेले.
दरम्यान, ट्रॅक्टर परत न करता परस्पर मध्यप्रदेशात हनुमंत शुगर मिल कंपनीत भाड्याने लावून दिला. त्यानंतर तिघांनी घेवून गेलेले ट्रॅक्टर परत केले नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रॅक्टर विक्रेता गोकुळ पाटील यांनी बुधवारी १३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडीलाल सिताराम राठोड रा. सांगवी ता.चाळीसगाव, विठ्ठल रघुनाथ जाधव रा. शिवापूर ता. चाळीसगाव आणि अर्जून इंदल जाधाव रा. राजदोहरे ता. चाळीसगाव यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र पाटील हे करीत आहे.