मुंबई – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रायगड किल्ला केंद्राकडून राज्याच्या ताब्यात घेऊन शिवरायांच्या काळात हा किल्ला जसा होता तसा तो पुन्हा बनविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि बोट क्लबचे तसेच खारघर (नवी मुंबई) येथील एमटीडीसी रेसीडेन्सी या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी छगन भुजबळ यांनी रायगड किल्ला केंद्राकडून राज्याच्या ताब्यात घेऊन शिवरायांच्या काळात हा किल्ला जसा होता तसा तो पुन्हा बनविण्याची संकल्पना मांडली. तसेच नाशिक हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. इथे पर्यटक आल्यानंतर तो फक्त देवदर्शन करुन परत न जाता त्याने काही दिवस इथे रहावे यासाठी परिसरातील अनेक पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत आहे. परिसरातील शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रुंगीगड आदी पर्यटनस्थळांची कनेक्टिव्हीटी वाढविण्यात आली आहे. आज सुरु करण्यात आलेले ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि बोट क्लबमुळे नाशिकच्या पर्यटनास मोठी चालना मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.