जळगाव, प्रतिनिधी । शहरातील आदर्श नगर व गणपती नगर भागात मोकाट कुत्र्यानीं धुमाकूळ घातला असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे व्हॉटसअपद्वारे केली आहे.
आदर्श नगर व गणपती नगर भागात दिवसा,रात्री अवेळी एकाच वेळी १५/२० मोकाट कुत्री जमा होतात. यानंतर हे मोकाट कुत्रे पायी चालणारे , दुचाकी ,चारचाकीच्या मागे लागतात. त्यांच्या अशा पाठलाग करण्याने नेहमी अपघात होतात. या अपघातात अनेक लहान मुले जखमी होतात. या कुत्र्यांमुळे नागरिक अपंग होऊ शकतात तरी या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी श्री. सोनवणे यांनी केली आहे. तसेच त्यांनी उपायुक्त, आरोग्य अधिकारी, प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक, या सर्वांकडे व्हॉटसअपद्वारे तक्रार केली आहे.