देवेंद्रजी निर्णय मागे घ्या : नेत्यांची मनधरणी !

मुंबई-वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा म्हणून नेत्यांनी मनधरणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या पदावरून मुक्त होऊन पक्ष कार्यालयात कामगिरी मिळावी अशी इच्छा व्यक्त केल्यावर भाजपच नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा हा पवित्रा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घेण्याचा हा प्रयत्न असल्याची टिका आणि आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये मात्र नेत्यांनी फडणवीस यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस हे मोठे नेते असून पराभवाची जबाबदारी ही फक्त त्यांची नसून आम्हा सर्वांची असून ते आपला निर्णय मागे घेतील असा आशावाद व्यक्त केला आहे. दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी फडणवीस हे आधारवड असून त्यांनी आपला निर्णय बदलावा असे आवाहन केले आहे. यासोबत पक्षाच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्याकडे धाव घेतल्याचे दिसून येत आहे. यावर आता फडणवीस हे काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content