जळगाव प्रतिनिधी । धुळे येथे आंदोलनकर्त्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केली आहे.
धुळे येथे अभाविपच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण खूप गाजत आहे. या प्रकरणी आ. गिरीश महाजन यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून याचा निषेध केला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा होत नसतील तर विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करा, शैक्षणिक शुल्कात कपात करा, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे मंत्री व धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाडीसमोर रास्ता रोको आंदोलन केले. पालकमंत्र्यांनी गाडीत बसून न राहता किमान विद्यार्थ्यांना सामोरे जाऊन निवेदन स्वीकारण्याचा उमदेपणा दाखवायला हवा होता.
यात पुढे म्हटले आहे की, आंदोलन करणारे विद्यार्थीच होते, चोर किंवा दरोडेखोर नव्हते !
कदाचित याचा उमज महाविकासआघाडी सरकारला आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना झाला नसावा… मंत्रीमहोदयांच्या डोळ्यांदेखत व संमतीनेच पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली. पोलिसांकडून विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा जाहीर निषेध ! सबंधितांवर लवकरात लवकर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आ. गिरीश महाजन यांनी केली आहे.