जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बाबा मौला अली मौला यांच्या ऊरूस व संदल कार्यक्रमात बॅनरवर नाव न टाकण्याच्या कारणावरून जळगाव शहरातील गेंदालाल मील परिसरात तरूणावर तलवार हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी ७ मे रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी ८ मे रोजी रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात बाबा मौला अली मौला यांचा उरूस व संदलचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी काही बॅनर लावण्यात आले होते. दरम्यान, या बॅनरवर नाव न टाकण्याच्या कारणावरून गेंदालाल मिल परिसरात मंगळवार ७ मे रोजी रात्री ९ वाजता दोन गटात वाद झाला. यात अस्लम उर्फ बाबुराव भीकन शेख याला कासीम अली सैय्यद, समीर उर्फ मोची आणि रईस (पुर्ण नाव माहित नाही) तिघे रा. गेंदालाल मिल, जळगाव यांनी बॅनरवर नाव न टाकल्याच्या कारणावरून शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली. यातील कासीम याने हातातील तलवारने हल्ला केला असता अस्लमची आई जाहीराबी भीकन शेख यांनी तलवार पकडली. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली. हा प्रकार घडल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी तिघांना अटक केली. याप्रकरणी बुधवारी ८ मे रोजी सकाळी ९ वाजता जाहीराबी भिकन शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कासीम अली सैय्यद, समीर उर्फ मोची आणि रईस (पुर्ण नाव माहित नाही) तिघे रा. गेंदालाल मिल, जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर हे करीत आहे.