Home Cities जळगाव स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवाराचा सिंधुताई कोल्हेंना जाहीर पाठिंबा !

स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवाराचा सिंधुताई कोल्हेंना जाहीर पाठिंबा !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ११ क मध्ये एक मोठी राजकीय घडामोडी घडली आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवार जया साळुंखे यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीच्या उमेदवार, माजी नगराध्यक्षा सिंधुताई कोल्हे यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. या निर्णयामुळे प्रभाग ११ मधील निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे बदलले असून शिवसेना शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

आमदार चंद्रकांत सोनवणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश :
जया साळुंखे यांनी केवळ पाठिंबाच दिला नाही, तर अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार सोनवणे यांनी जया साळुंखे यांचे पक्षात स्वागत केले आणि “या निर्णयामुळे महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास :
यावेळी पत्रकारांशी बोलताना जया साळुंखे यांनी आपल्या निर्णयाचे कारण स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि शहरात सुरू असलेल्या विकासकामांनी मी प्रभावित झाले आहे. प्रभागाचा प्रलंबित विकास केवळ महायुतीच करू शकते, या खात्रीतून मी सिंधुताई कोल्हे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.” केवळ सत्तेसाठी नव्हे, तर प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण हा पाऊल उचलल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सिंधुताई कोल्हेंची बाजू भक्कम :
माजी नगराध्यक्षा सिंधुताई कोल्हे यांचा या प्रभागात आधीच दांडगा जनसंपर्क आहे. आता त्यात जया साळुंखे यांच्या समर्थकांची भर पडल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घडामोडीमुळे प्रभाग ११ मध्ये ‘धनुष्यबाणा’चे पारडे जड झाले असून, मतदारांमध्येही याची मोठी चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात मिळालेला हा पाठिंबा महायुतीसाठी ‘बूस्टर डोस’ ठरला आहे.


Protected Content

Play sound