चाळीसगाव प्रतिनिधी । येथील युवा नेते मंगेश चव्हाण मित्रपरिवार व गावातील समस्त सामाजिक संस्था यांच्यामार्फत शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘शिव सह्याद्री’ या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या महानाट्यामध्ये सहभागी असलेल्या कलाकारांना आज (दि.१२) हरी धाम सनातन सेवा ट्रस्टचे स्वामी किशोर गिरीजी महाराज यांनी भेट देऊन आशीर्वाद दिलेत.
यात त्यांनी बुद्धी, दुसऱ्याला प्रभावित करणे व आत्मविश्वास या तीन गोष्टी असल्यास आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो, असे सांगितलेयावेळी शहरातील कलाकारांची तालीम बघून त्यांनी कौतुक केले. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते कलावंतांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
येत्या १७ व १८ ऑगस्ट रोजी शिवसह्याद्री महानाट्याचे येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक हौशी कलावंतांनी दिनांक १ ऑगस्टपासून दररोज दोनवेळा त्यासाठी येथील पाटीदार भवनात कसून सराव सुरू केला आहे. या महानाट्यात शहरातील महाविद्यालयीन व शाळकरी तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आहे. नाट्य यशस्वीतेसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोरपडे, विजय निरखे, प्रदीप पुराणिक, भूषण पाटील, संग्राम पाटील, भास्कर पाटील, चेतन चव्हाण, सिद्धांत पाटील, रोहित कोतकर, प्रणव वाघ आदी परिश्रम घेत आहेत.