मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंग, भोजन, कॅब सेवा, हॉटेल बुकिंग यांसारख्या सुविधा मिळवण्यासाठी अनेक ॲप्सचा वापर करावा लागत असे. मात्र, आता रेल्वेने ‘स्व’ नावाचे सुपर ॲप तयार केले आहे, जे या सर्व सेवा एकाच ठिकाणी पुरवेल. या ॲपची सध्या चाचणी सुरू असून, पहिल्या टप्प्यात १,००० लोकांनी याचा वापर केला. दुसऱ्या टप्प्यात १०,००० लोकांवर त्याची चाचणी घेतली जात आहे. हे ॲप एप्रिलनंतर कधीही सर्व प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
हे ॲप केवळ तिकीट बुकिंगपुरते मर्यादित नसून, यात व्हीलचेअर बुकिंग, वैद्यकीय आणीबाणीच्या सुविधा, तसेच पोलिसांशी त्वरित संपर्क साधण्याचे पर्यायही असतील. रेल्वेच्या सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सेंटर (CRIS) युनिटने दोन वर्षांच्या संशोधनानंतर हे ॲप विकसित केले असून, ते अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर चालेल.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे ॲप एक सिंगल सोल्युशन विंडो म्हणून कार्य करेल. तिकीट बुकिंग, खाद्यपदार्थ ऑर्डर करणे, पार्सल बुकिंग, हॉटेल व कॅब बुकिंग, आसनस्थिती, गाडीची माहिती, चोरी किंवा इतर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवण्याची सुविधा यात असेल. याशिवाय कुली बुकिंग, बोगी क्लिनिंग रिक्वेस्ट, तांत्रिक बिघाड दुरुस्तीच्या विनंत्या आणि नैसर्गिक संकटाच्या वेळेस पर्यायी व्यवस्था कळवण्याची सुविधादेखील उपलब्ध असेल.
प्रवाशांच्या सोयीसाठी या ॲपमध्ये मनी वॉलेट सुविधा देण्यात आली आहे. अनेकदा ऑनलाइन बुकिंग करताना पैसे वजा होतात पण तिकीट मिळत नाही. अशा वेळी सुपर ॲपच्या वॉलेटमधून पैसे तत्काळ परत मिळतील. तसेच, प्रवासादरम्यान गाडी थांबली तर त्याचे कारणही ॲपद्वारे प्रवाशांना समजेल. हे ॲप रेल्वेच्या प्रवासाला अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.