जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सतत दारू पिऊन घरी येवून मारहाण करणारा पती आणि सासरच्या मंडळींच्या जांचाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान, मुलीला गळफास देवून तिला ठार मारण्यात आले आहे असा आरोप मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विवाहितेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. सोनी चेतन चव्हाण वय २२ रा. धानवड ता. जळगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धानवड येथे सोनी चव्हाण ही विवाहिता आपल्या पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. सोमवारी १७ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सोनी हिने घरी कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर विवाहितेच्या सासरकडील मंडळींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विन देवचे यांनी तपासून मयत घोषीत केले. दरम्यान विवाहितेच्या आई व वडील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवन आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.
गेल्या तीन वर्षांपासून तिचे पती चेतन गजानन चव्हाण याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे दारू पिऊन मारहाण करणे सुरूच होते. याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने यापुर्वी देखील विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आताचा हा प्रकार आत्महत्येचा नसून तिला गळफास घेवून ठार मारले आहे, असा आरोप मयत विवाहिता सोनी चव्हाण यांची आई अनिता विनोद जाधव रा. नांद्रा तांडा ता, सोयगाव यांनी केला आहे. दरम्यान मुलीला ठार मारणाऱ्या विवाहितेच्या पतीसह तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यास घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विवाहितेच्या पश्चात सार्थक (वय-३) प्रथमेश (वय-५) ही दोन मुलं, आई, वडील, एक भाऊ, लहान बहिण असा परिवार आहे.