बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बदली होऊन ४ महिने उलटले तरी रावेर पोलिस ठाण्यात हजर न होणारे पोलिस कर्मचारी भूषण रतीलाल सपकाळे यांना निलंबित करण्यात आले. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांनी काढले.

याबाबत अधिक माहिती अशी की, चार महिन्यांपूर्वी पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई भूषण सपकाळे यांची रावेर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली होती. बदलीचे आदेश निघाल्या वेळी सपकाळे हे रजेवर असताना त्यांना २६ जुलै रोजी तालुका पोलिस ठाण्यातून कार्यमुक्त करण्यात आले. आता ४ महिने उलटून देखील सपकाळे हे बदली झालेल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर झाले नाही. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी तसा अहवाल पोलीस अधिक्षक महेशवर रेड्डी यांना पाठविला. सेवा कालावधीत दीर्घकाळ अनुपस्थितीत राहत असल्याचा ठपका ठेवण्यात आला, असून सपकाळे यांना निलंबित करण्यात आले. त्यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहे.

Protected Content