
हेग (वृत्तसंस्था) हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. जाधव यांच्या फाशीला न्यायालयाने स्थगिती दिली असून त्यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची परवानगीही देण्यात आली आहे. भारताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मोठा विजय मनाला जात आहे.
दक्षिण आशियाच्या आंतरराष्ट्रीय कायदेशीर सल्लागार रीमा ओमर यांच्या माहितीनुसार, आयसीजेने कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून भारतावर लावण्यात आलेल्या आरोपांना योग्य मानलेले नाही. २ वर्षे आणि दोन महिने आससीजेमध्ये १५ सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आज या प्रकरणावर निकाल देताना खंडपीठाने जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सेस देण्याचाही आदेश दिला. तसेच पाकिस्तानने जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा, असे कोर्टाने म्हटले आहे. या शिक्षेचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत त्यांना दिलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात येत असल्याचा आदेश यावेळी कोर्टाने दिला. दरम्यान, जाधव यांना कायदेशील मदत देण्यात यावी असेही कोर्टाने म्हटले आहे.
आयसीजेमध्ये भारताच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी बाजू मांडली होती. पाकिस्तानने वारंवार कौन्सिलर अॅक्सेस नाकारुन व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे सांगत भारताने आपला युक्तीवाद केला होता. पण आता कौन्सिलर अॅक्सेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना करारातील कलम 36 चे उल्लंघन केल्याचा ठपका आयसीजेने ठेवलाय.