सस्पेन्स संपला : चंद्रकांत पाटील शिवसेनेकडून लढणार !

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ! आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश घेतला असून यामुळे ते धनुष्यबाण चिन्हावर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून विजय संपादन केला होता. यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. गेल्या अडीच वर्षांपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. असे असले तरी ते तांत्रिकदृष्टीने अपक्ष आमदार म्हणूनच होते. यातच गेल्या अनेक दिवसांपासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सुटणार असल्याचे वृत्त आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो आपल्याला मान्य राहील असे स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर आज मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. या सभेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला मिळणार असुन येथून चंद्रकांत पाटील हे धनुष्यबाण या चिन्हावर लढणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. येथून त्यांचा मुकाबला शरद पवार गटातर्फे उभ्या राहणाऱ्या रोहिणीताई खडसे यांच्यासह अन्य उमेदवारांशी होणार आहे.

Protected Content