‘त्या’ शेतीचा ताबा देण्याची प्रक्रिया स्थगित करा : प्रशासनाला निवेदन

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा उपनिबंधकांनी सावकारी प्रकरणात दस्त नोंद केलेल्या शेतीचा ताबा देण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, जिल्हा उपनिबंधकांनी अलीकडेच सावकारी प्रकरणात जमीनीचे दस्त नोंदणी प्रक्रिया रद्द करून मूळ मालकांना जमीन परत देण्याचा निर्णय दिला होता. हा निर्णय अशा स्वरूपाचा राज्यातील पहिलाच असल्याने यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणात दस्त नोंदणी रद्द करण्यात आलेल्या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, उपनिबंधकांनी निर्णय दिलेल्या जमीनी आम्ही रीतसरपणे १५ ते २० वर्षांच्या आधी खरेदी केलेल्या आहेत. या जमीनीचे टायटल क्लीअर असून सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच ही खरेदी करण्यात आलेली आहे. यासाठी नोंदणी फी देखील नियमानुसार भरण्यात आलेली आहे. तसेच या प्रकरणातील सावकाराशी आमचा कोणताही संबंध नाही. सदर जमीनीच्या वहिवाटीसाठी आम्ही विहिरी, कुपनलीका आदींसाठी मोठा खर्च केलेला आहे. सद्यस्थितीत याच जमीनींच्या आधारे आमच्या उपजिविकेचे साधन आहे. या प्रकरणी आम्ही न्यायालयात धाव देखील घेतली आहे. यामुळे न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत या जमीनीचा ताबा देण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

या निवेदनावर हरीचंद्र नरसो वाघुळदे, पुंडलीक लक्ष्मण पाटील ( दोन्ही राहणार हंबर्डी ता. यावल) व शरद चावदस पाटील ( रा. हिंगोणे, ता. यावल ); भरत किसन धांडे ( रा. चिनावल, ता. रावेर); महेंद्र रामदास गिरनारे (रा. उदळी, ता. रावेर); मधुकर दुला पाटील ( रा. चिनावल ); संजय ब्रिजलाल पाटील ( रा. कोचूर, ता. रावेर); प्रदीप भिकाजी सोनवणे; मिलींद रामदास पाटील ( रा. दुसखेडा, ता. यावल) व प्रमोद बाबूराव पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content