धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावखेडा भागातील भिलाटी परिसरातून अटक केली आहे. त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अनिल काशीनाथ सोनवणे रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव ह.मु. सावखेडा ता. जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोबाईल चोरी प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा सावखेडा परिसरातील भिलाटी भागात राहत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ ईश्वर पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्याने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती दिली. त्यानुसार पथकाने कारवाई करत भिलाटी भागातून अनिल सोनवणे याला अटक केली. त्याने चोरीची कबुली दिली. त्याला पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील, पोहेकॉ संदिप पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, पोहेकॉ प्रविण मांडोळे, ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांनी केली.