जळगाव प्रतिनिधी । काल रात्री बाहेर जाऊन येतो, असे सांगून घरातून निघालेल्या तालुक्यातील बोरनार येथील तरुणाचा म्हसावद येथे रेल्वेखाली येऊन संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या तरुणाने आत्महत्त्या केली, हा अपघात आहे, की त्याचा घातपात करण्यात आला आहे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण पंडित नेटारे (वय २५) रा.बोरनार, ता.जि.जळगाव हा हात मजुरीचे काम करतो. काल संध्याकाळी ९.०० वाजता मित्रांकडे जातो, असे आई-वडिलांना सांगून सांगून तो घरातून निघाला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे आई वडील व मोठा भाऊ त्याच्या शोधार्थ बाहेर पडले. मात्र रात्री उशिरापर्यंत तो मिळून न आल्याने, ते घरी परतले. आज सकाळी म्हसावद येथील एकवीरा मंदिराजवळ असलेल्या रेल्वे रुळावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.
एमआयडीसी पोलिसांनी तातडीने मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात अनोळखी म्हणून दाखल केला होता. दरम्यान म्हसावद पो.कॉ. शशी पाटील यांनी बोरणार, म्हसावद परिसरात गावातील पोलीस पाटील यांना घटनेची माहिती घेऊन विचारणा केली. त्यानंतर बोरनार येथील पोलीस पाटील चंद्रशेखर सूर्यवंशी यांनाही संपर्क करून घटनेची माहिती दिली होती. मयत प्रवीणच्या नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने धाव घेऊन मृतदेह ओळखला. याकामी गावाचे सरपंच प्रदीप चौधरी, उपसरपंच अरुण कोळी, पो.पा. चंद्रशेखर सूर्यवंशी यांनी त्यांना मदत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.