
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी पोलिसांनी कुसुंबा परिसरातून एका संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. अमोल सुरेश खैरनार (वय २८, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शनीवारी ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव एमआयडीसी पोलिसांना शनिवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कुसुंबा गावाजवळ एका व्यक्तीने गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनके यांच्यासह पोलीस कर्मचारी गणेश ठाकरे, किरण पाटील, नितीन ठाकूर आणि राहुल घेटे यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.
पोलिसांची गाडी पाहताच, संशयित आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले. झडती घेतली असता, त्याच्या कमरेला १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून तो कट्टा जप्त केला.



