जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिसांनी गेल्या महिन्यात दुचाकी चोरी करून पसार झालेल्या विजय श्रीराम बारेला (वय २४, रा. धुरकूट, जि. खरगोन) याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
देविदास कॉलनीतील रहिवासी भिकन दामू बोरसे यांच्या दुचाकीची १० डिसेंबर रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना विजय बारेला याने ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि त्यांच्या पथकाने विजय बारेला याला अटक केली.
पोलीसांनी केलेल्या चौकशीत विजय बारेला याने चोरीची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरी केलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपी विजय बारेला याच्यावर यापूर्वी चोपडा शहर, अडावद, जळगाव तालुका आणि धरणगाव पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे १० गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, आणि योगेश बारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.