जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर आयएमआर महाविद्यालयाजवळ १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मोबाइला लांबविणाऱ्या अक्षय मुकेश आटवाल उर्फ मॉडेल रा. गुरूनानक नगर या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी १३ डिसेंबर रेाजी दुपारी अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, हर्षल जितेंद्र पाटील (वय-१९) रा. विद्यासागर शिंदखेडा जि. धुळे ह.मु. शिवकॉलनी जळगाव. हा विद्यार्थी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आयएमआर महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत आहे. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास आयएमआर महाविद्यालयासमोरून मोबाईलवर बोलत पायी जात होता. त्याचवेळी विद्यार्थ्याच्या मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येवून हातातील १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून दुचाकीने पळ काढला. याप्रकरणी विद्यार्थ्याने जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, पो.ना. नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहूल पाटील यांनी सोमवार १३ डिसेंबर रोजी दुपारी शनीपेठेतील काट्याफाईल परिसरातून संशयित आरोपी अक्षय मुकेश अटवाल उर्फ मॉडेल रा. गुरूनानक नगर याला अटक केली. संशयित आरोपी हा रेकार्डवरील असल्याने त्याने जिल्हापेठ, एमआयडीसी, शहर पोलीस ठाण्यात यापुर्वी मोबाईल चोरीचे वेगवेगळे गुन्हा दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास एपीआय महेंद्र वाघमारे करीत आहे.