जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात पादचारी व्यक्तीचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या संशयिताला जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राखी मुळजाडे रा.जळगाव ह्या महिला रस्त्याने मोबाईलवर बोलत असतांना अज्ञात दोन भामट्यांनी मागून दुचाकीवर येवून हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना १७ फेब्रुवारी २०२१ रोजी घडली होती.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी संदीप राजू कोळी रा. कुरंगी ता.पाचोरा याला यापुर्वी अटक केली होती. तर दुसरा फरार संशयिताला जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेंद्र वाघमारे, पोना गणेश पाटील, पोना सलीम तडवी, पोका पहुरकर, पोका योगेश साबळे या पथकाने प्रविण भाईदास कोळी रा. विखरण ता. एरंडोल याला बुधवारी ८ डिसेंबर रोजी अटक केली आहे.
दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या दोघांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यतत आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.