जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तांबापूर परिसरातील राहणाऱ्या वृध्द महिलेचे बंद घर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने लांबविल्याची घटना घडली होती. या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी सुरत येथून अटक करून २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच त्याचे दोन साथीदार व एक अल्पवयीन मुलाला देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तांबापूर परिसरात तसलीमबी मोहम्मद सैय्यद (वय-६०) या महिला बकरीईदच्या निमित्ताने २६ जून ते ७ जुलै दरम्यान धुळे येथे मुलीकडे घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्यावेळी त्याचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४८ हजारांचा मु्देमाल लांबविला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ही घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तियाक अली राजीक अली याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी संयशित आरोपी इश्तियाक अली राजीक अली याला सुरत येथून अटक केली. त्याने हसीनाबी राजी अली (वय-५५) रा. तांबापूरा, अनिस हमीद शेख (वय-३१) आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी इतर साथीदारांना देखील ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीकडून २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिपक जगदाळे, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पो.ना. सचिन पाटील, पोकॉ मुकेश पाटील, अल्ताफ पठाण, मुकेश पाटील, योगेश बारी, छगन तायडे यांच्यासह आदींनी कारवाई केली.