जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जळगाव महानगरपालिका आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सहा ठिकाणी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे शहरातील वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची माहिती गोळा केली जाणार आहे. या सर्वेक्षणात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे 70 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पांडे डेअरी चौक, कोर्ट चौक आणि अन्य प्रमुख ठिकाणी वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची नोंद घेतली जात आहे. आज सायंकाळपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेचे प्रकाश पाटील, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे के. पी. अकोले, प्राचार्य पी. एम. पाटील, देशपांडे सर आणि महापालिकेच्या उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, या सर्वेक्षणातून मिळणाऱ्या माहितीनुसार शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी पुढील उपाययोजना आखल्या जातील. वाढत्या वाहनांमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा उपक्रमांच्या माध्यमातून समस्या ओळखून उपाययोजना करण्यात येणार आहेत.
तज्ज्ञांच्या मते, शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित प्रदूषण तपासणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर आणि नागरिकांची जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. महापालिकेच्या या पुढाकारामुळे भविष्यात जळगावच्या पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.