पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सारोळा येथील रहिवाशी तथा राज्याचे वाघ्या मुरळी शाहीर परिषदेचे कलावंत बापु यादव पाटील वाघ्या यांची लोकवर्गणीतून नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली.
ते मागील चाळीस वर्षे लोककलेच्या माध्यमातून विविध कलापथक, भजन, भारूड, तमाशा फडा मध्ये उत्कृष्ट हार्मोनियम वादन तसेच गायन, व विनोदी कलाकार म्हणून महाराष्ट्र भर फिरून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु त्यांना मूलबाळ व पत्नी म्हणून त्यांच्या मागे कुणाचेही पाठबळ नाही. आता वयाच्या पन्नाशी झाली. अशातच दोघी डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसल्याने त्यांचे खुप हाल होत आहेत.
अशा परिस्थितीत ते महाराष्ट्र राज्याचे वाघ्या मुरळी कलावंत शाहीर परिषदेचे जिल्हा सरचिटणीस शाहीर विठ्ठल महाजन यांना जावून भेटले. शाहीर विठ्ठल महाजन यांनी या कलावंताची संपूर्ण परिस्थिती एकुण घेतली आणि दि. २ नोव्हेंबर रोजी आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना कार्यालय येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर मध्ये जाऊन तपासणी केली. परंतु मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज भासत होती. म्हणून शाहीर विठ्ठल महाजन यांनी स्वत: लोकांना भेटून मदतीची मागणी केली.
दानशूर लोकांनी तेवढीच सढळ हाताने मदत केली. आणि शेवटी कांताई नेत्रालय, जळगाव येथे दि. ३ नोव्हंबर रोजी शस्त्रक्रिया झाली व गरजु कलावंत रूग्णाला मदत व आधार मिळाल्याने समाधान झाले. शासनाने अशा उपेक्षित कलावंतांना ज्यांनी आयुष्यभर कलेच्या माध्यमातून मनोरंजन व प्रबोधन केले. त्यांच्या कडे दुर्लक्ष न करता त्यांच्या परिवाराचे उदरनिर्वाह व आरोग्यासाठी मानधन देवून काही तरी उपाययोजना करावी. अशी अपेक्षा शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन यांनी व्यक्त केली आहे. व लवकरच या मागणीकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे या मागणीसाठी जिल्हाभरात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना निवेदन देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येईल. असे जाहीर केले. यावेळी दि. ३ नोव्हेंबर रोजी सांयकाळी सावता महाराज टी स्टाॅल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रुग्णाला फळे, तुप, खाद्य पदार्थ देवुन शाहीर विठ्ठल महाजन व नाना वाघ यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.