पुणे–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना मंगळवारी (दि. २३ डिसेंबर) खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत विराम दिला. अद्याप कोणतीही औपचारिक चर्चा सुरू झालेली नाही, तसेच कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव एकमेकांकडे पाठवण्यात आलेला नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

पुण्यातील निवडणुका या कोणत्याही व्यक्तीभोवती केंद्रित नसून त्या पुणेकरांच्या हितासाठी आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी असतात, असे प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले. पुण्यातील नागरिक आणि शहराचा विकास हेच आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असून, निवडणूक ही व्यक्ती किंवा गटांबाबत नसून जनतेबाबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युतीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या कोणत्याही पातळीवर औपचारिक चर्चा झालेली नाही. आम्ही किंवा त्यांनी कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. भविष्यात युती करायची की नाही, कोणाला सामावून घ्यायचे किंवा नाही, हे सर्व चर्चा झाल्यानंतरच ठरवले जाईल. हा कोणत्याही व्यक्तींचा किंवा मुलांचा प्रश्न नसून, तो पूर्णतः राजकीय निर्णयाचा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीच्या संदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांनी आघाडी एकत्र ठेवण्यासाठी आपला प्रयत्न सुरूच राहील, असे सांगितले. पुणे महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढवाव्यात, अशी आमची इच्छा आहे, असे त्या म्हणाल्या. यासाठी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की राजकारणात पुढे-मागे अनेक घडामोडी घडत असतात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीबाबत विचारले असता, सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीवर भर देत, लोकहित आणि विकास हा केंद्रबिंदू असायला हवा, अशी भूमिका मांडली.
सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे पुणे महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत चित्र अधिक स्पष्ट झाले असून, आगामी काळात महाविकास आघाडी कोणती रणनीती आखते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



