नवीदिल्ली (वृत्तसंस्था) चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. लालू यांनी जामिनासाठी केलेला अर्ज आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे लालूंना सध्या तरी जेलमध्येच राहावे लागणार आहे.
प्रकृतीचे कारण पुढे करून लालू प्रसाद यादव यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. लालू बाहेर आल्यानंतर राजकारणात सक्रीय होतील, असे सीबीआयने सुप्रीम कोर्टात सांगितल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या जामीन अर्जावर सुनावणी केली. लालू प्रसाद यादव हे गेल्या आठ महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी विशेष सुविधा दिली जात आहे, असे सीबीआयने सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
लालू प्रसाद यादव हे चार प्रकरणात दोषी आढळले आहेत. त्यांना १६८ महिन्यांची शिक्षा कोर्टाने ठोठावली असून त्यांनी आतापर्यंत केवळ २० महिन्यांची शिक्षा पूर्ण केली आहे. शिक्षेच्या तुलनेत त्यांनी १५ टक्के शिक्षाही भोगली नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळण्यास ते अपात्र ठरतात, असेही सीबीआयने सुप्रीम कोर्टात सांगितले आहे.