सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांना वैद्यकीय जामीन मंजूर

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील नवाब मलिक यांच्या जामिनावर सुनावणी होईपर्यंत नवाब मलिक यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांसाठी तात्पुरता जामीन दिला होता. मलिक यांनी अर्जात किडनी, यकृत, हृदय याच्याशी संबंधित व्याधी असल्याचं नमूद केले होते. आता नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम केला आहे. त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातो आहे.

नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालय निकाल देत नाहीत तोपर्यंत ते बाहेरच असणार आहे. न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या समोर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात त्यावेळी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंनी अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा संघर्ष दिसून आला होता. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे लाच घेण्यासाठी हे सगळे करतात, तसेच त्यांचे जात प्रमाणपत्रही खोटे आहे असेही आरोप नवाब मलिक यांनी केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली. दाऊदशी संबंधित सलीम फ्रूटशी व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. ज्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागलं होतं. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा वैद्यकीय जामीन कायम केला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगात जावं लागणार नाही. मुंबई उच्च न्यायालय निर्णय देईपर्यंत नवाब मलिक तुरुंगाबाहेरच असणार आहेत. बार अँड बेंचने हे वृत्त दिलं आहे.

Protected Content