नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावलीय. या याचिकेत कोणतेही तथ्य नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
2 मे रोजी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर कोर्टात निर्णय झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष जय भगवान शर्मा आणि अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष सी. पी. कौशिक यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वइच्छेने ब्रिटनची नागरिकता स्वीकारण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तर गृह मंत्रालयानेही काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती. दरम्यान, आम्ही ही याचिका फेटाळत असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट करत एखाद्या कंपनीने एका अर्जात राहुल गांधी यांचा ब्रिटीश नागरिक म्हणून उल्लेख केला तर त्यामुळे ते ब्रिटीश नागरिक झाले का?, अशी टिप्पणी केली.