भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात तिसऱ्यांदा घेतली झेप

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी संध्याकाळी बोईंगच्या स्टारलायनर यानातून अवकाशात झेप घेतली. यावेळच्या तिसऱ्या प्रक्षेपण प्रयत्नासाठी डिझाइनमध्येही त्यांनी मदत केली आहे. यापूर्वी, विविध तांत्रिक अडचणींमुळे प्रक्षेपण टेक ऑफच्या काही मिनिटांपूर्वी दोनदा थांबवावे लागले होते. याआधी 1 जून 2024 रोजी टेकऑफच्या चार मिनिटे आधी ग्राउंड कॉम्प्युटरने रॉकेटमध्ये तांत्रिक समस्या असल्याचे दर्शविल्यानंतर ते रद्द करण्यात आले. त्यापूर्वी 7 मे रोजीही अशीच परिस्थिती उद्भवली होती. आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारी बोईंगची स्टारलायनर मोहीम आज, 5 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8:22 वाजता प्रक्षेपित करण्यात आली. अंतराळयान दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री 9.45 वाजता आयएसएसवर पोहोचेल.

स्टारलायनर अंतराळयान आणि त्याच्या उपप्रणालींची चाचणी घेण्यासाठी सुमारे एक आठवडा ते अंतराळ स्थानकात राहील. मोहीम यशस्वी झाल्यास, या अंतराळयानाचा वापर फिरत्या मोहिमांसाठी केला जाईल. म्हणजेच अंतराळवीर त्याद्वारे आयएसएसवर येतील आणि जातील. इतिहासात प्रथमच अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यासाठी अमेरिकेकडे 2 अंतराळयान असतील. सध्या अमेरिकेकडे फक्त इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीचे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आहे.

Protected Content