सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा नगरपरिषदेच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, अपक्ष आघाडी गटाची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या मान्यतेनंतर पूर्ण झाली आहे. या निर्णयामुळे नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली असून, अपक्ष आघाडी गटाला प्रशासकीय स्तरावर अधिकृत ओळख मिळाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त पत्रानुसार, तायडे सुनिता संजय या गटनेता असलेल्या अपक्ष आघाडी गटाची नोंदणी करण्यात आली आहे. गणेश उर्फ विशाल भागवत सोनवणे, सावदा नगरपरिषद यांच्या वतीने दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. संबंधित प्रस्ताव नियमांनुसार सादर करण्यात आल्याने गट नोंदणीस मंजुरी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ मधील नियम ३ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ६३ (२)(ब) अन्वये सावदा नगरपरिषदेमधील एकूण दोन पालिका सदस्यांचा अपक्ष आघाडी गट स्थापन करण्यात आला आहे. या संदर्भातील सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे विधिवतपणे प्रशासनाकडे सादर करण्यात आली होती.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित नियमांतील नमुना क्रमांक ४ नुसार गटाची तसेच गटातील सदस्यांची स्वतंत्र नोंदवहीत अधिकृत नोंद घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे. या अधिकृत नोंदीमुळे अपक्ष आघाडी गटाची कायदेशीर व प्रशासकीय मान्यता स्पष्ट झाली आहे.



