जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गिरणा पंपींग प्लॉट येथून जुनी पाईपलाईन जेसीबीद्वारे खोदून बीडच्या पाईपांची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच्या चौकशीत महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
गिरणा पंपींग प्लॉट येथून जुनी पाईपलाईन जेसीबीद्वारे खोदून बीडच्या पाईपांची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सोमवारी 2 डिसेंबर रोजी रात्री उशीरापर्यंत जळगाव महापालिका पाणी पुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकुण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सहा पैकी चार संशयितांना अटक करण्यात आली. या चौघांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
जळगाव शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते जळगाव तालुक्यातील उमाळे येथील फिल्टर प्लॉन्ट येथे कामकाज पाहत असतांना त्यांना ओळखीच्या ठेकेदाराने फोन केला व सांगितले की, गिरणा पंपिंगजवळील आर्यन पार्क येथे पंपिंगवरून गेलेली जुनी पाईपलाईन जेसीबीच्या माध्यमातून खोदून काढत आहे. त्यानुसार योगेश बोरोले यांनी त्यांचे सहकारी पंप अटेंडंट नरेश चंद्रात्रे, मजूर अनिल रतन पाटील यांना घटनास्थळी बोलावून घेत मी पण तिथे येत असल्याचे सांगितले.
असे घडले प्रकरण
दरम्यान सायंकाळी 6.30 वाजता बोरोले हे सहकारी अभियंता शामकांत भांडारकर, विशाल सुर्वे, दिपक चौधरी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी जेसीबी क्रमांक (एमएच 32 पी 3855) जवळ जेसीबी मालक नरेंद्र निवृत्ती पाणगडे ( वय 30), रोहन किशोर चौधरी वय 23 रा. शिरसोली हे मिळून आले. यावेळी नरेंद्र पानगडेची चौकशी सुरू असतांना रोहन चौधरी याने पळ काढला. त्यानंतर थोड्या वेळाने तिथे अक्षय मनोज अग्रवाल (वय 30 रा. भवानीपेठ, जळगाव ) हा तिथे दाखल झाला. त्यावेळी नरेंद्र पानगडे याने चौकशीत सदर पाईपलाईन ही अक्षय अग्रवाल, भावेश भानुदास पाटील वय 20 रा. मेहरूण, अमिन सलीम राठोड ( वय 35 रा. मच्छी बाजार, मेहरूण, जळगाव ) यांच्या सांगण्यावरून खोदली आहे. तसेच जेसीबी आणण्याबाबत अक्षय अग्रवाल यांच्या सांगण्यावरून आणल्याचे सांगितले. दरम्यान चौकशीत पाईपलाईन काढण्याबाबत कोणताही ठेका दिलेला नसल्याचे देखील चौकशीत समोर आले आहे.
सुरूवातीला चार जणांविरोधात गुन्हा
यावेळी अभियंता बोरोले यांनी खोदून काढलेले अडीच लाख रूपये किंमतीचे 6 बीडचे पाईप, अडीच लाख रूपये किंतीचे जेसीबी असा एकुण 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, जळगाव महापालिका पाणी पुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अक्षय मनोज अग्रवाल (वय 30 रा. भवानीपेठ, जळगाव), भावेश भानुदास पाटील (वय 20 रा. मेहरूण, जळगाव), अमिन सलीम राठोड (वय 35 रा. मच्छी बाजार, मेहरूण, जळगाव), नरेंद्र निवृत्ती पाणगडे वय 30 रा. शिरसोली ता.जळगाव या चार जणांविरोधात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकशीत आले माजी मनपा विरोधी पक्ष नेते यांचे नाव !
दरम्यान, अक्षय अग्रवाल याची या प्रकरणात चौकशी केली असता त्याने रोहन किशोर चौधरी यांच्या मध्यस्थीने जळगाव महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनिल सुपडू महाजन यांचे नावे सांगत आपण त्यांच्या सांगण्यावरून या पाईपलाईनचे खोदकाम केले असल्याच कबुली दिली आहे. अक्षय अग्रवालच्या जबाबावरून रोहन किशोर चौधरी (वय 23 रा. शिरसोली) आणि सुनिल सुपडू महाजन रा. मेहरूण, जळगाव यांची नावे देखील गुन्ह्यात वाढविण्यात आले आहे.
गुन्ह्यातील चार जणांना अटक व जामीन
या गुन्ह्यात अक्षय मनोज मनोज अग्रवाल, भावेश भानुदास पाटील, अमिन सलीम राठोड, रोहन चौधरी यांना अटक करण्यात आली. बुधवारी 3 नोव्हेंबर रोजी दुपारी चौघांना जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्या. श्रीमती बढे यांच्या न्यायलयात हजर केले असता चौघांना जामीन मिळाला आहे.
सुनील महाजन यांचा शोध तर एकास दिली नोटीस
दरम्यान, या घटनेत गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस कर्मचारी हे सुनिल सुपडू महाजन यांच्या घरी गेले असता महाजन हे मिळून आले नाहीत. तर नरेंद्र पाणगुडे याचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना न्यायालयीन नोटीस देवून सोडून देण्यात आले आहे.
या संदर्भात ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’च्या प्रस्तुत प्रतिनिधीने सुनील महाजन यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. तर, त्यांचे निकटवर्तीय ललीत धांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाशी सुनील महाजन यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.