मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत पूर्णविराम देत पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पटेल म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढणे ही पक्षाची प्राथमिक जबाबदारी आहे. सध्या विलीनीकरणावर चर्चा करण्याची वेळ नसून पक्ष स्वतंत्रपणे संघटनात्मक आणि विधिमंडळातील पदांची पूर्तता करत आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या विमान अपघातावर भाष्य करताना पटेल यांनी थेट विमान कंपनीवर जबाबदारी टाकली. या दुर्घटनेत विमान कंपनीची भूमिका सर्वाधिक असल्याचे प्रथमदर्शनी वाटत असून, पायलटकडून काही दुर्लक्ष झाले असेल, तर ते तपासातून समोर येईल, असे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी आपण त्यांच्याशी फोनवर संवाद साधल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले. हा फोन शेतकऱ्यांच्या कामासंदर्भात होता आणि कोणत्याही वैयक्तिक फाईलसाठी किंवा इतर कारणासाठी नव्हता, असे त्यांनी सांगितले. आपण त्या वेळी दिल्ली येथे होतो आणि अजित पवार कुठे आहेत, याची माहिती नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रोहित पवार यांनी पायलटने विमान मुद्दाम खाली पाडल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना पटेल यांनी संयमी भूमिका घेतली. कोणतेही ठोस पुरावे नसताना आरोप-प्रत्यारोप करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी या विषयावर थेट भाष्य टाळले.
या दुर्घटनेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. ही घटना महाराष्ट्र राज्यात घडल्यामुळे राज्य सरकारने CBI चौकशीचे आदेश द्यावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिल्याचे पटेल यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाची पुनर्रचना करण्यास सुरुवात झाली असून, सुनेत्रा पवार यांच्या निवडीद्वारे पक्ष संघटनात्मक स्थैर्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच विमान दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी CBI तपासाची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणाचा सत्य बाहेर येण्यावर भर दिला आहे.



