Home Cities जळगाव सुमेध गाढेची राज्य कर निरीक्षक पदावर निवड

सुमेध गाढेची राज्य कर निरीक्षक पदावर निवड


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथील मेहनती व अभ्यासू विद्यार्थी सुमेध गाढे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत राज्य कर निरीक्षक (STI) या प्रतिष्ठित पदावर निवड होऊन महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुमेध गाढे यांनी आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्न, स्वअनुशासन आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान अभ्यासाच्या नियोजनाबरोबरच मानसिक स्थैर्य राखणे आणि वेळेचे योग्य नियोजन करणे यावर भर दिला. त्यांच्या या यशात महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन हा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

या यशाबद्दल महाविद्यालयात आयोजित छोटेखानी सत्कार समारंभात प्राचार्य प्रा. एल. पी. देशमुख यांनी सुमेधचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी त्यांनी सुमेधच्या प्रयत्नांचे कौतुक करत, “महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हे प्रेरणादायी उदाहरण आहे,” असे मत व्यक्त केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील आणि प्रा. घनश्याम पाटील उपस्थित होते.

सुमेध गाढे यांनी यश मिळवून महाविद्यालय, कुटुंब आणि संपूर्ण शहराचा गौरव वाढविला आहे. भविष्यातही ते प्रशासन क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा बजावतील आणि समाजासाठी आदर्श अधिकारी ठरतील, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound