जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तृतीयपंथीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवार १७ जून रोजी सकाळी ८.३० उघडकीला आले आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तराणा उर्फ रहीम शेख रसाय (वय-२४) रा.दहीगाव ता. यावल ह.मु. सुप्रिम कॉलनी जळगाव असे मृत तृतीयपंथीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “यावल तालुक्यातील दहिगाव येथील तराणा उर्फ रहीम ही गेल्या चार महिन्यांपूर्वी सुरत येथून जळगावात आली होती. शहरातील सुप्रिम कॉलनीत ती एकटीच भाड्याच्या घरात राहत होती. दरम्यान, तिचा लहान भाऊ हुसेन शेख रयास हा तिच्या घरासमोर आपल्या पत्नीसह वास्तव्यास होता.
गुरुवारी १६ जून रोजी रात्री तराणा हिने आपल्या भावाकडे जेवण केले त्यानंतर ती आपल्या घरी निघून गेली. शुक्रवारी, १७ जून रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास हुसेनची पत्नी ही तराणा हिला चहा देण्यासाठी गेला असता घरात दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर खिडकीतून पाहिले असता तराणा हिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीला आली. याबाबत एमआयडीसी पोलीसांना माहिती देण्यात आली.
पोलीस कर्मचारी गणेश शिरसाळे व संदीप धनगर यांनी घटनेचा पंचनामा केला. व मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मतात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या पश्चात वडील, दोन भाऊ, वहिनी, बहिण असा परिवार आहे.