पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील गाळण येथील विवाहितेने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतू ही आत्महत्या नसून तिचा गळा आवळून गळफास देवून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
मयत विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश हा नाशिक येथे कंपनीत नौकरीस असुन त्याचे भावाचे व त्याचे नाशिक येथे दोन मेडिकल आहेत. विवाहितेचे वडील सुर्यभान सिताराम पाटील यांची परिस्थिती अतिशय बिकट असुन ते दुसऱ्याच्या घरी सालदारकी करतात तर आई अनिता सुर्यभान पाटील ह्या मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात. मुलगा चांगला नोकरीला असल्यामुळे त्यांनी मुलगी सुवर्णाचा विवाह कर्ज काढून केला होता. विवाह प्रसंगी ७ लाख रुपये हुंडा कबुल केल्यानंतर त्यापैकी ५ लाख रुपये रोख दिले होते. त्यानंतर उर्वरित २ लाख रुपये बाकी असल्याने तिला माहेरहून आणण्यासाठी सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे सुवर्णा ही माहेरी आल्यानंतर व भ्रमणध्वनी द्वारे सांगत होती. दरम्यान, १ जुन रोजी बुधवारी रात्री ७ वाजता सुवर्णाच्या आईने सुवर्णास फोन करून सांगितले की, ‘माझी नणंद एक महिन्यापासुन येथे आली असुन ती २ लाख रुपयांसाठी माझ्याशी सतत भांडत आहे सांगितले. दुसऱ्या दिवशी आईची चिंता वाढल्याने तिने गुरूवार २ जुन रोजी सकाळी १० वाजता पुन्हा सुवर्णा हिस फोन लावण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद स्थितीत येत होता. यानंतर अवघ्या तासाभरातच सुवर्णाच्या आईला सुवर्णाच्या जेठाने फोन करुन तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळविले. दरम्यान घराचा दरवाजा आतुन बंद असल्याने शेजारील एका लहान मुलाने तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला असता सुवर्णा हिचा काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने मुलाने खिडकी उघडून पाहिले असता तिचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गावात सर्वत्र चर्चा पसरली.
जेठ व पती बाहेरगावी
सुवर्णाचा जेठ मोहन चुडामण पाटील हा नाशिक येथे राहत असुन त्याचा अपघात झालेला असल्याने तो तेथील ओखार्ड हॉस्पिटल येथे उपचार घेत असल्याने त्याचा भाऊ योगेश हा देखील देखभाल करण्यासाठी गेलेला आहे. सुवर्णाची सासु ही दोन दिवसांपासून बाहेरगावी गेलेली आहे. तर सासरे चुडामण पाटील हे पाचोरा येथे सुर्यफुल विकण्यासाठी गेलेले असल्याचे सांगण्यात आले. घटनेप्रसंगी सुवर्णा व तिची नणंद या दोन्हीच घरी होत्या.
विवाहितेला फाशी दिल्याचा आरोप
याबाबत नेहमीच मुलगी आई वडिलांकडे सासरच्या मंडळींची तक्रार करत होती. सासरची मंडळी कधी तरी सुधरतील असे सांगुन आम्ही तिला सासरी नांदायला पाठवत होतो. आमची मुलगी आत्महत्या करण्या सारखी नव्हती. मुलीचे निधन झाल्यानंतर घरी असलेले सासरे व नणंद हे पसार झाल्याने तिला अगोदर फाशी दिली व नंतर दोर बांधून छताला लटकविले. यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा खुन केल्याचा आम्हाला संशय असुन त्यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मयत मुलीच्या आई, वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी भेट दिली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पाचोरा पोलिस करत आहेत.