चाळीसगाव प्रतिनिधी । चारित्र्यावर संशय घेऊन निवृत्त झालेल्या वडीलांच्या पैशातून पैसे घेऊन ये म्हणत महिलेचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, आरती दिपक खैरनार (वय- ३३ रा. निकम कॉलणी, जुना मालेगाव रोड चाळीसगाव) हिचा लग्न सन २००९ मध्ये दिपक खैरनार याच्याशी झाला होता. दरम्यान सुरूवातीला सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. मात्र काही दिवस उलटल्यानंतर पती दिपक खैरनार व सासु आशाबाई बाळकृष्ण खैरनार यांच्याकडून चारित्र्यावर संशय घेऊन घरात अमानवी वागणूक दिली जात होती. दररोज पती दिपक खैरनार यांच्याकडून शिवीगाळ करत मारहाण केली जात असे. दरम्यानच्या काळात सदर महिलेचा वडील ईश्वर बनगर मोरे (वय-६१ रा. बोरोलेनगर ता. चोपडा) हे सेवानिवृत्त झाले. त्यांना मिळालेल्या पैशातून ‘पैसे घेऊन ये अन्यथा घरातून हाकलून देऊ’ अशी धमकी देऊन दररोज शारीरिक व मानसिक छळ केली जात असल्याने या त्रासाला कंटाळून आरती दिपक खैरनार हिने गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केली. ह्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाविर जाधव हे करीत आहेत.