जालना (वृत्तसंस्था) येथील एका सहायक पोलिस निरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील गोंदी येथील पोलिस वसाहतीत शुक्रवारी (ता.15) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अनिल परजणे असे या आत्महत्या केलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
ही आत्महत्या त्यांनी कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून गोंदी येथील पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. मध्यंतरी वाळू माफीयांच्या मुद्यावरून त्यांचे आणि वाळू माफीयांचे तसेच पोलीस दलातील वरिष्ठांसोबत किरकोळ वाद झाले होते. ते मुळचे अंमलनेर तालुक्यातील रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस उप. निरीक्षक सी. डी. सेवगन तसेच पो. उप. नि. हनुमंत वारे यांनी गोंदी येथे भेट दिली. खालापुरी गावात पोलीस शिपायापासून ते सहायक पोलीस निरीक्षकपर्यंत अधिकारी आहेत. या गावाची पोलिसांचे गाव म्हणून ओळख आहे. २००६ साली अनिल परजणे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले. नागपूरात त्यांना पहिली पोस्टींग मिळाली. सध्या ते जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांच्या आत्महत्येची वार्ता समजताच खालापुरी गावात दुखवटा पाळण्यात आला. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.