जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुरतहून झारखंड येथे धरणगाव मार्गे रेल्वेने प्रवास करतांना दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा अचानक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राबीया हुमायू अन्सारी रा. झारखंड ह.मु.सुरत गुजरात असे मृत बालिकेचे नाव आहे.
याबबात अधिक असे की, झारखंड येथील रहिवाशी हुमायू अन्सारी (वय-३०) हे आपल्या पत्नी गुडीया अन्सारी यांच्यासह गुजरात राज्यातील सुरत येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याला आहे. रेडीमेड कापड कारखान्यात ते नोकरीला आहे. लग्न झाल्यापासून १० वर्षापर्यंत दांपत्याला अपत्य नव्हते. म्हणून हुमायू यांनी शालक यांची एक महिन्याची मुलगी दत्तक म्हणून घेतले होते. दरम्यान, रविवारी २२ ऑक्टोबर रोजी ते झारखंडला जाण्यासाठी सुरत येथून रेल्वेनेप्रवास करत होते. सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास धरणगाव येथून प्रवास करत असतांना बालिका राबीया हिची अचानक तब्बेत बिघडली. त्यामुळे त्यामुळे हे दाम्पत्य भुसावळ येथे उतरले. भुसावळ रेल्वे पोलीसांच्या मदतीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. यावेळी बालिकेचे निधन झाल्याने दाम्पत्याने एकच आक्रोश केला होता. सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत भुसावळ रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी आनंद सरोदे करीत आहे.