जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हातापायाला अचानक कमजोरी आल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होऊन गंभीर झालेल्या रुग्णाला वाचविण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पथकाला यश आले आहे. उपचारांती पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
साहेबराव संतोष चव्हाण (वय ५२, रा. गोपाळपुरा,जळगाव) यांना हातापायामध्ये कमजोरी येणे तसेच श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याला उपचारासाठी ३१ जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणी केली असता त्याला गुलेंन बारे सिंड्रोम हा आजार झाल्याचे निष्पन्न झालं. रुग्णाला तातडीने अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले.
गुलेंन बारे सिंड्रोम हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. या रुग्णाला महागडे ‘इम्युनोग्लोबीन’ औषधदेखील देण्यात आले. उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णाला लाभ देण्यात आला. साधारणपणे दहा दिवस यशस्वीपणे उपचार केल्यावर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्ण साहेबराव चव्हाण यांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला. यावेळी औषधवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भाऊराव नाखले उपस्थित होते. उपचारासाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. इम्रान तेली, डॉ. तुषार सोनवणे, डॉ. संदीप बोरसे, डॉ. संतोष पोटे, डॉ. सुबोध महल्ले, कक्ष १४ च्या इन्चार्ज सिस्टर माया सोळंकी, कक्ष ९ चे इन्चार्ज ब्रदर तुषार पाटील यांच्यासह वैद्यकीय पथकाने उपचार केले.