जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे आज “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : उपलब्धी, आव्हाने आणि भविष्यवेध” या विषयावर एक दिवसीय विद्यापीठस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्न नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन (एन.मुक्ता) आणि नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिसंवादात शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मौलिक विचार मांडले.

या परिसंवादाचे उद्घाटन प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ प्रा. एस.टी. इंगळे (प्र-कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख (नूतन मराठा महाविद्यालय), राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समिती सदस्य प्राचार्य अनिल राव आणि एन.मुक्ता अध्यक्ष डॉ. नितीन बारी यांचा समावेश होता. बीज भाषणात प्राचार्य अनिल राव यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची संकल्पना, कार्यवाहीतील अडचणी आणि भविष्यातील दिशा यावर सखोल भाष्य केले.

सकाळच्या उद्घाटनानंतर विविध विषयशाखांनुसार परिसंवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. मानव्य व आंतरविद्याशाखेचे नेतृत्व डॉ. जगदीश पाटील (अधिष्ठाता, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), वाणिज्य शाखेचे डॉ. राहुल कुलकर्णी, तर विज्ञान शाखेचे सत्र डॉ. केतन नारखेडे यांनी संयोजित केले. या सत्रांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विविध अंगांवर तज्ज्ञांनी अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणली.
दुपारी झालेल्या शंका समाधान सत्रात प्राचार्य अनिल राव यांनी उपस्थित शिक्षकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंका दूर केल्या. परिसंवादाचा समारोप सत्र हे डॉ. कपिल सिंघेल (सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी डॉ. पवन पाटील (सचिव, एन.मुक्ता) यांच्यासह २५० ते ३०० प्राध्यापक उपस्थित होते.
या परिसंवादात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी, स्थानिक स्तरावरची गरज, आणि भविष्यातील उपाययोजना यावर भर देण्यात आला. सहभागी शिक्षकांनी यामधून मार्गदर्शन घेत नवे दृष्टिकोन आत्मसात केल्याचे मत व्यक्त केले.



