एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा सात दिवसीय हिवाळी शिबीराचा यशस्वी समारोप

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यू प्रतिनिधी । यावल तालुक्यातील भालोद येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचे हिवाळी शिबिर हिंगोणे या दत्तक गावात आयोजित करण्यात आले होते. सात दिवस चाललेल्या या शिबिराचा समारोप समारंभ मंगळवारी १४ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला.

समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेकंडरी सोसायटी भालोदचे चेअरमन लीलाधर विश्वनाथ चौधरी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून यावलचे नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे उपस्थित होते. या कार्यक्रमाला सोसायटीचे सचिव नितीन चौधरी, संचालक किशोर महाजन, मधुकर परतणे, आणि लीलाधर चौधरी यांचीही उपस्थिती होती.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा.डॉ.पी.डी. पाटील, प्रा.नरेंद्र नारखेडे, प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर गाजरे, तसेच हिंगोणे येथील तलाठी संदीप गोसावी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिबिरात स्वयंसेवकांनी हिंगोणे गावातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवली. गावातील टिटवा रोडवरील बंधाऱ्याचे खोलीकरण करून ग्रामस्थांना पाण्याच्या साठ्याबाबत जागरूक केले. दररोज प्रभात फेरी व रॅली काढून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न झाला. शाळाबाह्य मुला-मुलींच्या सर्वेक्षणाद्वारे शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक गिरीश पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिनेश महाजन यांनी केले. नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी आपल्या भाषणात एनएसएसचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “राष्ट्रीय सेवा योजना विभाग व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी व्यासपीठ आहे. यामुळेच मी आज या पदावर आहे.” प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांनी एनएसएसमुळे श्रमदान व समाजसेवेच्या संस्कारांचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होतो असे नमूद केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये लीलाधर चौधरी यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, श्रमाचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी एनएसएसच्या कार्याची प्रशंसा केली.

उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून प्रशांत जवरे आणि उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून मयुरी सपकार यांना गौरवण्यात आले. अश्विनी रोझोदे, प्रशांत जवरे, गिरीश पाटील आणि रियाज तडवी यांनी आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन टिना कोळी यांनी केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. दिनेश महाजन, प्रा. काशिनाथ पाटील, आणि प्रा. मोहिनी तायडे यांनी मेहनत घेतली.

Protected Content