मुंबई, विशेष प्रतिनिधी | भुजल विकास यंत्रणेचे महाराष्ट्राचे मुख्य संचालक कौस्तुभ दिवेगावकर (आय.ए.एस.) व सहाय्यक संचालक विलास वहाने (राज्य पुरातत्व विभाग) यांच्यासोबत सह्याद्री प्रतिष्ठानची आज भुजल भवनमध्ये एक बैठक झाली.
यात मुख्यत्वे गडकोटावरील पिण्याच्या टाक्यांचा मुळ स्रोत सुरू करणे, ज्या टाक्यात बारामही पाणी असते त्यातील पाण्याचे शुद्धीकरण तपासणे, ज्या गडाच्या माचीवर गावातील लोकांना नवी विहीर काढून देणे, इत्यादी विषय बैठकीत करण्याचे ठरले. येत्या २८ ऑगस्ट रोजी यावर आणखी बैठक होणार असून यात कामाची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे. पावसाळा संपला की, साधारण १५ सप्टेंबरनंतर भुजल विकास यंत्रणेचे भुजल शास्त्रज्ञ स्वतः गडावर येऊन परीक्षण करणार आहेत.
बैठकीत पुणे जिल्ह्यातील राजगड, तोरणा, कोरीगड या टाक्यांची प्रथम चाचणी होऊन यावर लक्ष केंद्रित होणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड यावर पाण्याची सोय करण्यासाठीही प्रयत्न होणार आहेत. तसेच कोथळी गडावरील माचीवरील वस्त्यांवर पाणी पिण्यासाठी नवी विहीर बांधून देत यावी, यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. उद्याच या संबंधीचे पत्र राज्य पुरातत्व विभाग, भुजल विकास यंत्रणेस देणार आहे.