‘या’ दिवशी विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका मिळणार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वितरण विद्यार्थ्यांना ११ जून रोजी दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. गुणपत्रिका मिळाल्यावर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशांची प्रक्रिया करता येणार आहे.

राज्य मंडळाने नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा मार्चमध्ये घेतली. या परीक्षेचा निकाल २७ मे रोजी जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल राज्य मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच मेमध्ये जाहीर झाला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. कोकण विभागाने निकालाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १.९८ टक्के निकाल वाढला आहे. वाढलेल्या निकालाचा परिणाम अकरावी आणि अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी पात्रता गुण वाढण्यावर होण्याची शक्यता आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका कधी दिल्या जाणार याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना होती. या पार्श्वभूमीवर गुणपत्रिकांचे वितरण ११ जून रोजी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. ११ जूनला विभागीय मंडळाकडून सकाळी अकरा वाजता माध्यमिक शाळांना गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शवणारे अभिलेख यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर माध्यमिक शाळांकडून त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शवणारे अभिलेख वितरित करायचे असल्याचे नमूद करण्यात आले.

Protected Content