भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका महाविद्यालयात बॅडमिंटन खेळणाऱ्या अल्पवयीन मुलींकडे पाहून शिट्टी वाजवून कमेंट पास केल्याचा जाब विचारणाऱ्या पिडीत मुलीच्या भाऊ व त्यांच्या मित्राला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. यामध्ये महाविद्यालयातील तीन अल्पवयीन मुलांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता जबर मारहाण व विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, भुसावळ शहरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शहरातील एका महाविद्यालयात बी.कॉमचे शिक्षण घेत आहे. गुरूवारी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पिडीत मुलगी ही तिच्या मैत्रीणींसोबत बॅडमिंटन खेळत असतांना महाविद्यालयात शिक्षण घेणारे तीन अल्पवयीन मुले हे मुलींकडे पाहून शिट्ट्या वाजवून काहीतरी कमेंट करू लागले. त्यावेळी पिडीत मुलीचा चुलत भाऊ व त्याचे मित्र यांनी शिट्टी मारणाऱ्या मुलांना “तुझ्या बहिणीला पण असे करशील का ?” असा जाब विचारला.

या रागातून महाविद्यालयातील तीन अल्पवयीन मुलांना पिडीत मुलीच्या भावाला व भावाच्या मित्रांला शिवीगाळ करत धारदार वस्तूने वार करून गंभीर दुखापत केली. तसेच पिडीत मुलींना अश्लिल हावभाव करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत त्यांचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार रात्री ११ वाजता तीन अल्पवयीन मुलांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.



