धरणगाव (प्रतिनिधी) महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी अतोनात परिश्रम घेऊन समाज परिवर्तनाचे काम केले म्हणून आपण निर्भयपणे आपली विचार व्यक्त करू शकतो, या महापुरुषांच्या विचारांची रूजवणूक करा, आई वडील आणि गुरूजन यांचा सन्मान करा, नियमित अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी पी. आर. हायस्कूल येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मांडले.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा. बी. एन. चौधरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी हे उपस्थित होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले.अंबादास मोरे यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. पोलिस हे मित्र असतात हे स्पष्ट करून त्यांनी मुलींना निर्भय होण्याचे आवाहन केले. यावेळी सुनील चौधरी आणि मुख्याध्यापक बी एन चौधरी यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर डी एस पाटील यांनी केले तर आभार शरदकुमार बन्सी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मोरे यांनी विद्यार्थिनींना बंदूकीची प्रत्याक्षिकासह माहिती दिली.