Home Cities चोपडा विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करताना सजग राहावे : सपोनि प्रमोद वाघ

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करताना सजग राहावे : सपोनि प्रमोद वाघ


अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि मोबाईल वापराबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून सपोनि प्रमोद वाघ, हवालदार शेषराव तोरे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो, जो आपल्याला सतत शिकत राहण्याची आणि विचारशीलतेची प्रेरणा देतो.”

सपोनि प्रमोद वाघ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, आज मोबाईल हा शिक्षणासाठी उपयुक्त साधन असला तरी त्याचा चुकीचा वापर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम करू शकतो. मोबाईलचा वापर करताना सजग राहावे, गेम खेळताना किंवा अज्ञात ऍप्स डाउनलोड करताना काळजी घ्यावी, कारण यामुळे वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचा गैरवापर होऊ शकतो. विद्यार्थिनींनीही सोशल मीडिया व विविध ऍप्स वापरताना गोपनीयता राखावी, असे त्यांनी सांगितले.

यशस्वीतेसाठी उपशिक्षक एन. ए. महाजन, व्ही. एम. महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पी. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पी. एस. पवार, निकिता माळी, लिपिक सी. एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, कैलास महाजन आणि अशोक महाजन यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आणि आभार एस. जी. महाजन यांनी मानले.

 


Protected Content

Play sound