Home Cities जळगाव पातरखेडा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना यशस्वी उपचारांनंतर रुग्णालयातून सुट्टी

पातरखेडा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना यशस्वी उपचारांनंतर रुग्णालयातून सुट्टी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील पातरखेडा येथील एकविरा माता आदिवासी मुलांच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसारित झाले होते. मात्र, २४ जुलै २०२५ रोजी शाळा प्रशासनाच्या ही बाब लक्षात येताच, तात्काळ उपचार सुरू करण्यात आले होते. आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव विजयदादा पाटील यांनी दिली.

विद्यार्थ्यांमध्ये आजाराची लक्षणे दिसताच, आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय पथकाने त्वरित उपचार सुरू केले. काही विद्यार्थ्यांमध्ये गोवरची गंभीर लक्षणे आढळल्याने, त्यांना पुढील उपचारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे पाठवण्यात आले. अथक उपचारांमुळे आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

संस्थेचे सचिव विजयदादा पाटील यांनी सांगितले की, गोवरसदृश्य आजाराची नवीन कोणतीही नोंद झालेली नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता भासली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेला भेट दिली असता, गोवरची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात घरी पाठवण्याच्या मौखिक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना काही कालावधीसाठी पालकांसोबत घरी पाठवण्यात आले आहे.

ग्रामीण रुग्णालय, एरंडोल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील डॉक्टर्स, तसेच आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजारी विद्यार्थ्यांची अहोरात्र काळजी घेतली. उपचारादरम्यान, संस्थेचे सचिव विजयदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दूध, फळे, नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या काळजीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली.

आश्रमशाळा व्यवस्थापन आता पालकांशी संपर्क साधून गोवर आजाराविषयीचे गैरसमज दूर करणार आहे, जेणेकरून विद्यार्थी लवकरच पुढील शिक्षणासाठी आश्रमशाळेत परत येऊ शकतील. विद्यार्थी परत आल्यानंतर, वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार आश्रमशाळेत गोवर लसीकरण मोहीम राबवली जाईल आणि विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाईल, असेही विजयदादा पाटील यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound