जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय रेल्वेच्या नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ने जळगावकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले असून, या गाडीचा आनंद विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवासातून अनुभवला. विशेष म्हणजे, जळगाव येथील नंदिनीबाई वामनराव विद्यालय तसेच खूबचंद सागरमल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जळगाव ते भुसावळ या छोटेखानी प्रवासात गाडीतील अत्याधुनिक सुविधा अनुभवत अमृत भारत ट्रेनचा जल्लोषात आनंद लुटला.

जळगाव रेल्वे स्थानकावर या गाडीच्या स्वागतासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार स्मिताताई वाघ, पद्मश्री एडवोकेट उज्वल निकम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पणन महामंडळाचे रोहित निकम, भाजपा रेल्वे प्रकोष्ठचे प्रतीक शेठ आदी मान्यवरांनी लोको पायलटचे स्वागत करून गाडीला हिरवा झेंडा दाखवला. या सोहळ्यात मान्यवरांसह नागरिकांचीही मोठी उपस्थिती होती.

ही ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गुजरातमधील उधना (सुरत) येथून ओडिशाच्या ब्रह्मपूर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार असून, दर आठवड्याला एक फेरी होणार आहे. या गाडीमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात आरामदायी आसने, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, डेस्टिनेशन इंडिकेटर, मोबाईल होल्डर आणि आपत्कालीन अलार्म सिस्टीम यांचा समावेश आहे. त्यामुळे कमी बजेटमध्येही प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
ही ट्रेन एकूण २२ कोचेससह धावणार आहे. यामध्ये ११ जनरल डबे, ८ स्लीपर कोचेस, १ पँट्री कार, २ द्वितीय श्रेणी कोचेस असून, याशिवाय एक कोच अपंग प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विविध प्रवासी वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन या ट्रेनची रचना करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी या प्रवासादरम्यान फोटोग्राफी करत आणि ट्रेनच्या सुविधांचा आस्वाद घेत प्रवासाचा मनमुराद आनंद घेतला. अशा प्रकारचे शैक्षणिक आणि प्रात्यक्षिक अनुभव विद्यार्थ्यांमध्ये रेल्वेप्रति उत्सुकता आणि जागरूकता वाढवण्यास मदत करत आहेत.
अमृत भारत एक्सप्रेसने केवळ प्रवासाचे साधन म्हणून नव्हे, तर ‘विकसनशील भारत’चा चेहरा म्हणून रेल्वेच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन घडवले आहे. स्वस्त, सुरक्षित, आणि सुविधा युक्त अशा या ट्रेनमुळे महाराष्ट्रातील आणि देशभरातील प्रवाशांसाठी हा प्रवास नक्कीच ‘अमृतमय’ ठरणार आहे.



