वढोदे येथे विद्यार्थी आणि पत्रकारिता कार्यशाळा उत्साहात

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावद येथून जवळ असलेल्या वढोदा येथील सर्चलाईट इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थी आणि पत्रकारिता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शामकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून शामकांत पाटील हे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आवाज परिवर्तनाचा या साप्ताहिकाचे संपादक तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.अनोमदर्शी तायडे हे होते.

 

 

यावेळी बोलतांना शामकांत पाटील यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मागील ३५ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असतांनाच लेवा जगतचे संपादक, दिव्य मराठी वृत्तपत्राचे सावदा शहर प्रतिनिधी, सावदा शहराचे नगरसेवक, ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष, अशा विवीध क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्यांनी मांडला. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि तो असायलाच पाहिजे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात काम करत असताना बऱ्याचदा पत्रकारांना स्वतःच्या परिवाराला सुद्धा वेळ देता येत नाही.

 

दिवस-रात्र वृत्तसंकलन करत असताना वेळप्रसंगी स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घालायची पत्रकारांची तयारी असते. कोणत्याही पत्रकाराला आपला इतिहास, वर्तमानकाळातील सामाजिक तशाच राजकीय घडामोडी आणि येणा-या भविष्यकाळातील काही अंदाजात्मक गोष्टींची जाण असायला पाहिजे. पत्रकार म्हणजे असा व्यक्ती ज्याला स्वतःचा आणि समाजाचा अनुभव यांची सांगड घालून निस्वार्थ भावनेने नागरिकांसमोर चांगले वाईट अनुभव मांडता आले पाहिजेत. ज्याला कोणत्याही विषयावर लिहिताना त्या विषयाची सखोल माहिती असायला हवी व कुणाला नसेल तर त्या विषयाची माहिती घेण्याची जिज्ञासा असायला हवी, सध्याच्या युगात पत्रकारिता क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झालेले असून विद्यार्थ्यांनी फक्त विषय म्हणून नव्हे तर करिअर म्हणून या क्षेत्राकडे बघावे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

 

अध्यक्ष स्थानावरून बोलताना अनोमदर्शी तायडे यांनी समाजात घडणाऱ्या घटनांचे वृत्त संकलन करत असताना कळत नकळतपणे कित्येक मित्र आणि कित्येक शत्रू बनत असतात, अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता निर्भीडपणे पत्रकारिता करणे, परिसरातील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवणे तसेच पत्रकारांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असते, यामुळे पत्रकारांनी सतर्क राहून कायद्याचा अभ्यास तसेच कायद्याचे महत्व या बाबतीत जागरूक राहणे आवश्यक असते असे मत मांडले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पत्रकारिता या क्षेत्राची तोंड ओळख करून विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्नांची उत्तरे उपस्थितांनी दिली.

 

सदर कार्यशाळेला संस्थेचे संचालक ॲड. योगेश तायडे, चेअरमन अश्विनी मेढे मॅडम, शिक्षक विजय भालेराव सर, शिक्षिका दिपाली लहासे मॅडम, रंजना बोदडे मॅडम, कविता बैसाने मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप तायडे आणि विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे पर्यवेक्षक पंकज बोदडे सर यांनी तर आभार मुख्याध्यापक नितीन झाल्टे सर यांनी मानले.

Protected Content