Home Cities जळगाव गोदावरी सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेचा शपथविधी !

गोदावरी सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेचा शपथविधी !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये नुकताच विद्यार्थी परिषदेचा शपथविधी (इन्व्हेस्टिचर सेरेमनी) सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेत शिस्त आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या या परिषदेच्या शपथविधीसाठी लेफ्टनंट कर्नल अश्विन वैद्य यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी ठरली.

या विशेष कार्यक्रमासाठी १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर, लेफ्टनंट कर्नल अश्विन वैद्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते इन्फंट्री – पंजाब रेजिमेंटचे अधिकारी असून, त्यांनी २००० साली इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथून सैन्यात प्रवेश केला आहे. लेफ्टनंट कर्नल वैद्य यांनी आपल्या सैनिकी सेवेत ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन मेघदूत, तसेच जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या शौर्य व कार्यक्षमतेसाठी त्यांना ‘आर्मी कमांडर कमेंडेशन’ हा सन्मान प्राप्त झाला आहे.

त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि अभिमान संचारला होता. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थी परिषदेला आत्मविश्वास मिळाला. या कार्यक्रमात सर्व हेड बॉय आणि हेड गर्ल यांना बॅचेस प्रदान करण्यात आले. शाळेचे अनुशासन टिकवून ठेवण्यासाठी या विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे आयोजन स्कूलच्या प्राचार्य सौ. नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शन आणि देशभक्तीपर घोषणांनी झाला. लेफ्टनंट कर्नल वैद्य यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.


Protected Content

Play sound