जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र बी.एच.आर. ठेवीदार संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांपासून ठेवीदार आपल्या रकमा मिळवण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत. उपोषण, निदर्शने, आणि विविध आंदोलने करूनही ठेवीदारांच्या हाती निराशाच लागली आहे. यामुळे आता ठेवीदारांनी अंतिम लढ्याची तयारी केली असून, संपूर्ण ठेवी मिळेपर्यंत पतसंस्थेच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
ठेवीदारांच्या प्रमुख मागण्या:
1. ठेवीदारांनी जमा केलेली संपूर्ण रक्कम व्याजासह तातडीने परत मिळावी.
2. ज्या ठेवीदारांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेतला आहे, तसेच जे गंभीर आजारांनी त्रस्त आहेत, त्यांना तातडीने त्यांची संपूर्ण रक्कम देण्यात यावी.
3. पतसंस्थेची आर्थिक स्थिती आणि वसुली प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी ठेवीदारांची एक स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि तिला संस्थेच्या आर्थिक कागदपत्रांची तपासणी करण्याचा अधिकार द्यावा.
ठेवीदार संघटनेच्या मते, पतसंस्थेने वेळोवेळी आश्वासने दिली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. अनेक ठेवीदार आपल्या हक्काच्या पैशासाठी वयस्कर असूनही कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. काहींची आर्थिक स्थिती इतकी बिकट झाली आहे की, त्यांच्या दैनंदिन गरजाही भागवणे कठीण झाले आहे. अनेक वृद्ध ठेवीदारांनी उपचाराअभावी प्राण गमावले असून, अजूनही अनेक ठेवीदार जीवन-मृत्यूशी झुंज देत आहेत.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ठेवीदार प्राणांतिक आंदोलन छेडतील. “पैशाअभावी मृत्यू स्वीकारण्यापेक्षा, आपल्या हक्काच्या पैशांसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार,” असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. ठेवीदारांच्या या गंभीर परिस्थितीकडे प्रशासन आणि सरकारने त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. जर लवकर तोडगा निघाला नाही, तर जळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण होऊ शकतो. आता या आंदोलनाकडे सरकार आणि वित्तीय संस्थांचे अधिकारी कसे प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.